MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी, विचार भविष्यवादी




आपल्या भारतीय संस्कृतीत किंबहुना जगाच्या पाठीवर जेव्हा एखादे मुल २५ व्या वर्षांत पदार्पण करतं तेव्हा त्या मुलाला आपण युवा किंवा तरुण म्हणून संबोधित करतो... तारुण्यात नवे विचार असतात, सळसळतं रक्त असतं, उंच भरारी घेण्याची मनिषा असते... त्याच तरुण मुलाप्रमाणे आज आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५व्या वर्षांत पदार्पण करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही नव्या विचारांची देवाणघेवाण होत आहे, आमच्या कार्यकर्त्यांमध्येही सळसळतं रक्त आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उंचच उंच भरारी घेण्याचे स्वप्न आहे...  या २५ वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढ उतार पाहिले, अनेक ऊन वारे सोसले, अनेकांनी हा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, आजही त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत पण या सगळ्यात हा वटवृक्ष कधी डगमगला नाही. कारण या वटवृक्षाचं बीज हे पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांनी पेरले आहे. १० जून १९९९ ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणातील काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, जिला कोणीच मिटवू शकत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा डोलारा आदरणीय पवार साहेबांनी उभा केला आहे. तो एक एक कार्यकर्त्याच्या मदतीने उभारला आहे. हा पक्ष तयार होत असताना प्रभू श्री रामांच्या वानरसेनेने ज्या प्रमाणे रामसेतू बनवण्यासाठी एक एक दगड रचला होता. त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते हा पक्ष इथपर्यंत आणण्यासाठी अहोरात्र झटले आहे. हल्ली काही आमदार लोकांच्या जीवावर निवडून येतात मात्र सत्तेच्या हव्यासेपोटी लोकांनी दिलेल्या मतांशी प्रतारणा करतात. पण त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की पक्ष हा आमदार खासदारांच्या जीवावर नसतो, तर आपल्या रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा असतो. आणि मला सांगायला खुप अभिमान वाटतो की, आमचा प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांप्रती, राष्ट्रवादीच्या विचारांप्रती अत्यंत निष्ठावान आहे. 


२००४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेस पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तेव्हा आम्हाला मुख्यमंत्री पदाची देखील संधी होती मात्र पवार साहेबांच्या दूरदृष्टीने सत्तेची अशी गणिते मांडली की राष्ट्रवादीच्या पारड्यात अधिकचे आणि लोकोपयोगी खाते मागून घेतले गेले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी उत्तुंग कामगिरी करत लोकांच्या ह्रदयात आपले स्थान निर्माण केले. या मंत्रिमंडळात आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सर्व तरुण मंडळींना संधी दिली होती. मला थेट अर्थमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती.  २००३-०४चा अर्थसंकल्प मांडत असताना आम्ही दलित वंचित आणि इतर मागास घटकांना नजरेसमोर ठेवून तो अर्थसंकल्प तयार केला होता. त्यात सर्व जातीजमातींना आम्ही केंद्रस्थानी ठेवले होते. ज्यावेळी केंद्रात युपीएचे सरकार स्थापन झाले त्यावेळी ते सरकार बनवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महत्त्वाची होती. आदरणीय पवार साहेब त्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री होते. ज्यावेळी पवार साहेबांनी पदभार स्वीकारला त्यावेळी देशात अन्नधान्याची कमतरता होती, देशातील शेतकरी प्रचंड अडचणीत होता. अन्नधान्य निर्यात करण्याची वेळ आपल्या देशावर आली होती. मात्र पवार साहेबांनी शेती क्षेत्रात महत्त्वाची धोरणे आखली आणि आयात करणारा देश निर्यातदार झाला. एकदा पवार साहेबांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आणले आणि त्यांना शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवली. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी पदरात पाडून घेतली. मधल्या काळात राज्यात भाजपचे सरकार होते. शेतकरी अडचणीत होता, या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी, कर्जमाफी मिळायला हवी यासाठी आम्ही सर्व विरोधक आग्रह करत होतो. सरकार कर्जमाफी करण्याच्या मनस्थितीत नव्हतं पण आम्ही झुकवल्यामुळे त्यांना कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र कर्जमाफी करताना सरकारने आखडते हात घेतले. त्यात बरेच किचकट नियम घातले होते. मात्र पवार साहेबांनी दिलेली कर्जमाफी तशी नव्हती, ती सरसकट होती. आजही देशातील शेतकरी पवार साहेबांचा तो निर्णय विसरले नाहीत. 


जेव्हा जेव्हा आपल्या देशावर संकट आले तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र मदतीला धावून गेला आहे. मग ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रुपाने असो व शरद पवार साहेबांच्या रुपाने. लोक उगाच म्हणत नाही की हिमालयाच्या मदतीला, सह्याद्री धावून जातो... २०१९ साल हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे वर्षे आहे. भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड संपूर्ण देशात सुरू होती. देशाच्या विकासासाठी ही सत्ता हस्तगत करण्याची शृंखला सुरू असती तर आम्हाला त्याची काही हरकत नव्हती. पण भाजप संपूर्ण लोकशाहीच संपवण्यासाठी या सत्तेचा दुरुपयोग करू पाहत आहे. बहुमताने बसलेले सरकार, साम दाम दंड भेद वापरून उद्ध्वस्त करायचे हे कुठले राजकारण? मीडिया, राजकीय विश्लेषक, खुद्द भाजप याला ऑपरेशन लोटस हे गोंडस नाव देत असेल मात्र खऱ्या अर्थाने ऑपरेशन लोटस लोकशाहीचा गळा घोटणेच! २०१९ साली भाजपच्या या खेळाला लगाम लावायचीच असे आमच्या पक्षाने ठरवले आणि ऐन निवडणुकीच्या काळात पक्ष सोडून जाणाऱ्यांविरोधात पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही दंड थोपटले. लोकांनी, खासकरून तरुण पिढीने आम्हाला भरघोस प्रतिसाद दिला आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. जे सोडून गेले त्यांना पराभव पत्कारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुनील शेळके, प्राजक्त तनपुरे, निलेश लंके, अदिती तटकरे, आशुतोष काळे, राजू नवघरे यांसारखे तरुण तडफदार नेतृत्व मिळाले. राज्यात कुणालाच स्पष्ट बहुमत नव्हते, भाजपच्या मनसुब्यांना हाणून पाडण्याची हीच ती वेळ होती! शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली आणि महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केले. 


महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असतानाही पवार साहेबांनी लोकांशी संबंधित खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागून घेतले. लोकांच्या हितासाठी अनेक धोरणे आम्ही आखली होती मात्र काळाने घाला घातला. संपूर्ण जगात कोविडने हाहाकार माजवला. महाराष्ट्र कोविडच्या प्रचंड विळख्यात सापडला होता. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर. त्यामुळे मुंबईत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पायाला भिंगरी बांधल्यागत काम करत होते. रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आम्ही सर्वच जिल्ह्यांचे पालकमंत्री प्रचंड मेहनत घेत होतो. कोविडशी लढताना आम्हाला स्वकीयांशीही लढावे लागत होते. जनता पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत होती. मात्र काही जण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता पीएम केअरला मदत करा असे सांगत होते. आपल्या महाराष्ट्राला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसी देण्यातही कुचराई केली गेली. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून इतका दुजाभाव केला गेला का? असा प्रश्न उपस्थित होतो मात्र अशा परिस्थितीतही आपण कोविडवर मात केली. महाराष्ट्राचे जगभरात कौतुक झाले. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच आमचे सरकार कपटाने पाडले गेले. पण लोकांना ते पटले नाही. आजही महाविकास आघाडीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. लोक निवडणुकांची वाट पाहत आहे. 


सध्या देशात एक लढाई सुरू आहे. ही लढाई भाजपशी नसून लोकशाही वाचवण्यासाठीची आहे. लढाई म्हटलं तर हल्ले प्रतिहल्ले आलेच पण सत्ताधारी पक्षाकडून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली जात आहे. सत्तेचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. सत्ताधारी पक्षाविरोधात बोलले तर कारवाई केली जाते. सोबत आले तर ठिक नाहीतर चौकशीचा फेरा पाठी लावला जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यादी फार मोठी आहे. हरकत नाही! आपल्याला या सर्व परिस्थितीत परिवर्तन करायचे असेल तर या गोष्टी सहन कराव्याच लागतील. ही धारणा आम्ही मान्य केली आहे. मला विश्वास आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सहकारी पक्ष ही परिस्थिती बदलतील आणि पुन्हा राज्यात फुले, शाहु, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे सरकार येईल. आपल्या महाराष्ट्रात आज शेतकरी मेटाकुटीला आला आहे, सहकार क्षेत्राचे तीनतेरा वाजत आहे, सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे, मध्यमवर्गीय कुटुंबाचे महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. सर्व सामान्य जनतेला होणारा त्रास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कदापी मान्य नाही. सामन्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नेहमीच अग्रभागी असेल.  त्याला साथ हवी आहे ती तुम्हा सर्वांची. मागील २४ वर्षांच्या काळात महाराष्ट्राची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि पुढे ही अशीच साथ देईल हा विश्वास मला आह

जयंत राजाराम पाटील, 

अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी