MY POSTS
नायकवडींनी रेटून लावला महापौर कार्यालयात अजितदादांचा फोटो
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महापौरांकडून स्टंटबाजीचा आरोप: फोटो उतरवला
जनप्रवास, प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो महापौर कार्यालयात लावण्यावरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी व उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक, नगरसेवक अतहर नायकवडी यांच्यात शाब्दिक वाद झाला. महापौरांना भेट दिलेला अजित पवारांचा फोटो महापौरांनी कार्यालयात न लावल्याने स्वत: नायकवडी यांनी रेटून कार्यालयात फोटो लावला. यामुळे संतप्त महापौरांनी नायकवडी यांना स्टंटबाजी करू नका, असे सुनावले. तर क्षणातच उपमुख्यमंत्री पवार यांचा फोटो महापौर कार्यालयातून उतरवला.
राज्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीसहून अधिक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. नऊ मंत्रीपदे देखील दादा गटाला मिळाली आहेत. त्यामुळे राज्यात सध्या शरद पवार विरूध्द अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचे पडसाद आता सांगली महापालिकेत उमटू लागले आहेत. मिरजेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अतहर नायकवडी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तर महापौैर दिग्विजय सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र सूर्यवंशी यांनी शरद पवारांसोबत कायम असल्याचा खुलासा केला होता.
हेही वाचा https://rajkiyalive.विलासराव जगताप, संग्रामसिंह, अमरसिंह देखमुखांवर अजितदादांचा डोळा
या घडामोडी सुरू असताना सोमवारी अजित पवार समर्थक, नगरसेवक अतहर नायकवडी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना अजित पवार यांचा फोटो भेट दिला. महापौर कार्यालयात हा फोटो लावावा, अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. महापौर सूर्यवंशी यांनी कर्मचारी बोलावून सायंकाळी फोटो लावून घेऊ, अशी ग्वाही दिली. मात्र नायकवडी यांनी महापौरांचे ऐकले नाही. त्यांनी आणल्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयात फोटो लावला. यामुळे महापौर संतप्त झाले. तुमचा फोटो मी स्वीकारला आहे, मी मनपा कर्मचार्यांकडून हा फोटो लावून घेतो, असे सांगितले असताना तुम्ही स्टंटबाजी करू नका, असे म्हणत महापौरांनी नायकवडी यांना सुनावले. त्यानंतर नायकवडी कार्यालयात सोडून गेले. क्षणातच महापौर सूर्यवंशी यांनी अजितदादांचा फोटो काढून ठेवला. या घटनेची चर्चा मात्र महापालिकेत चांगलीच रंगली होती.
हेही वाचा https://rajkiyalive. मी जयंतरावांचाच!
स्टंटबाजी करणे चुकीचे: महापौर
अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सन्मान आहे. आम्ही घरात देखील अनेक वर्षांपासून त्यांचा फोटो लावला आहे. मात्र एका नगरसेवकाने जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी फोटोची स्टंटबाजी केली. हे महापौर कार्यालय आहे. काही नियम असतात. त्यामुळे फोटो आम्ही लावतो, असे त्यांना सांगितले होते. त्यांनी न ऐकता रेटून फोटो लावला. हा प्रकार चुकीचा असून केवळ स्टंटबाजीसाठी केला गेला असल्याचा आरोप महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा