MY POSTS

SANGLI CRIME : पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक

इमेज
सांगली : शहरातील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेल्या तलवारीचा साठा कुपवाडच्या तरुणांकडून पोलिसांनी जप्त केला. त्याच्याकडून दहा तलवारी आणि एक मोटारसायकल असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. या प्रकरणी भगतसिंग विक्रमसिंग शीख (वय 21 रा. नेहरूनगर, कुपवाड) याला अटक करण्यात आली आहे.  SANGLI CRIME :  पोत्यात तलवारी भरून विकणार्‍या कुपवाडमधील तरूणास अटक   याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अवैध शस्त्रांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी संतोष गळवे यांना माहिती मिळाली कि, एक तरुण सांगली ते आष्टा मार्गावरील कृष्णा नदी रोडवर बेकायदेशीर तलवारीचा साठा विक्री करण्यासाठी येणार आहे.  मिळालेल्या माहिती प्रमाणे पथकातील कर्मचार्‍यांनी त्याठिकाणी तातडीने सापळा लावला असता संशयित भगतसिंग शीख हा फिरताना दिसला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्या जवळ असलेल्या मोटारसायकलच्या कॅरेजला असलेल्या पोत्यात दहा तलवारी मिळाल्या. या त

शेतकरी संघटनेच्या मुळावर BRS




दिनेशकुमार ऐतवडे

वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक प्रादेशिक पक्षांना उत आला आहे. लोकसभा निवडणूक म्हणजे प्रादेशिक पक्षाचे राष्ट्रीय पक्षात रूपांतर करण्याची एक चांगली संधी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे जो तो प्रादेशिक पक्ष आपला पक्ष कसा राष्ट्रीय पक्ष होईल, याच तयारीला लागले आहेत. यात आता आणखी एका पक्षाची भर पडली आहे, ती म्हणजे तेलंगणमधील बीआरएस या पक्षाची. के.चंद्रशेखर राव हे या पक्षाचे सर्व्हेसर्वा आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्रच्या सीमा लागूनच असल्याने के.चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय पसरायला सुरूवात केली आहे. पण राव यांचा बीआरएस पक्ष येथील शेतकरी संघटनेच्या मुळावर उठतो की काय अशी भिती सर्वांना वाटत आहे, कारण बीआरएसची स्थापनाच मुळी शेतकर्‍यांना डोळ्यासमारे ठेवून झाली आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांचा खरा वाली कोण हे येणार्‍या निवडणुकीतच कळेल.


कल्वकुंतल चंद्रशेखर राव  हे राव यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1954 ला सिद्दिपेट जवळील चींतमडका या गावी झाला.  हे गाव सध्या तेलंगणा राज्यात आहे. राव यांना 9 बहिणी आणि 1 मोठे भाऊ आहेत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठांतर्गत हैद्राबाद येथुन तेलगु भाषेमधे एम.एची पदवी प्राप्त केली आहे.

के.चंद्रशेखर राव हे तेलंगणा राज्याचे पहिले व विद्यमान मुख्यमंत्री आहेत. तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी अनेक वर्षे आंदोलन केले होते. त्यात त्यांना यश आले. ते सध्या भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री झालेल्या के. चंद्रशेखर राव यांना सध्या वेध लागले आहेत ते आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे. तसेच येणार्‍या लोकसभेला संपूर्ण भारतात तेलंगणा आणि बीआरएसचे नाव त्यांना पोहचवायचे आहे. पंतप्रधान मोदींना टक्कर देण्यासाठी अनेक नेते सरसावले आहेत. त्यामध्ये सर्वांत जास्त पुढे आहेत ते के. चंद्रशेखर राव. मुख्यमंत्री पदानंतर त्यांना वेध लागले आहेत ते पंतप्रधानपदाचे.

के चंद्रशेखर राव यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा आमदार असून, विद्यमान मंत्री आहे तर मुलगी खासदार आहे. त्यांचा एक भाचाही आमदार असून, त्यांच्याच सरकारमध्ये मंत्रीही आहे.

आपल्या राजकीय जिवनाची सुरूवात चंद्रशेखर राव यांनी विद्यार्थी नेता म्हणून केले. 1985 मध्ये त्यांनी एन. टी. रामा राव यांच्या तेलगु देसम पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. राव यांनी आपली राजकीय कारकिर्द तेलुगू देसम पक्षातून सुरू केली. ते पक्षाचे मधल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जात होते. याच भूमिकेत त्यांनी कित्येक वर्षे पक्षात घालवली. चंद्रशेखर राव हे दिवंगत नेते एन.टी.रामाराव यांचे खूप मोठे चाहते होते. इतके की त्यांनी आपल्या मुलाचे नावही त्यांच्याच नावावरून ठेवले आहे.

1987 मध्ये लगेच त्यांना मंत्रीमंडळात स्थानही मिळाले. काही काळ ते आंध्रप्रदेश विधानसभेमध्ये उपाध्यक्षही होते. 1997 मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळातही काम करण्याची संधी मिळाली. 2006 पर्यंत ते केंद्रात मंत्री होते.

राव यांच्या तोंडी नेहमीच आढळून येतं. ते म्हणजे, मी जन्मलो तेव्हा आपला मुलगा पुढे जाऊन मुख्यमंत्री बनेल, असं माझ्या आई-वडिलांना वाटलं असेल का? पण राजकारणात काहीही शक्य आहे.

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्द्यावरून के.चंद्रशेखर राव यांनी स्वतःचा तेलंगण राष्ट्र समिती पक्ष स्थापन केला. या माध्यमातून त्यांनी सुमारे 20 वर्ष संघर्ष करत विविध प्रकारच्या आव्हानांशी दोन हात केले. 2008 मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी त्यांच्यासमवेत तीन खासदार आणि 16 आमदारांनी राजीनामे दिले होते.

तेलंगण राज्य स्थापन झालं, त्यावेळी राव हे केवळ मुख्यमंत्रीच बनले नाहीत, तर राज्याच्या राजकारणात धक्का लागू शकणार नाही, असं सर्वोच्च स्थानही त्यांनी काबीज केलं. आता चंद्रशेखर राव यांच्या नजरा दिल्लीकडे आहेत. त्यासाठीचे डावपेच त्यांनी सुरू केल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकर्‍यांसाठी त्यांनी राज्यात अनेक चांगल्या योजना राबविल्या. तेलंगणामध्ये शेतकर्‍यांचा मसिहा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शेतकर्‍यांचा तारणहार असलेल्या के. चंद्रशेखर राव आता महाराष्ट्रात हात पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. यामागे त्यांचा दुहेरी हेतू आहे. एक तर या निमित्ताने त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल आणि राष्ट्रीय राजकारणात के. चंद्रशेखर राव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल.

त्यांच्या या निर्णयाने मात्र राज्यातील शेतकरी संघटनेच्या उरात धडकी भरली आहेे. महाराष्ट्रात राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी  संघटना, सदाभाउ खोत यांची रयत शेतकरी संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या बरोबरात अनेक शेतकरी संघटना कार्यरत आहेत. सर्वांचा हेतू शेतकर्‍यांचे कल्याण हे जरी असले तरी राजकारणाच्या साठमारीत अनेक संघटना लयास लागले आहेत. आज एकही आमदार किंवा खासदार शेतकरी संघटनेचा राहिला नाही. येणार्‍या लोकसभा आणि विधानसभेला अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात आता भर पडली आहे ती बीआरएस पक्षाची. बीआरएस पक्षाचे धोरणेही शेतकर्‍यांच्या कल्याणाचीच आहेत. राज्यात जितके बॅनर लागले आहेत, त्या सर्व बॅनरवर आम्ही शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेवू असेच लिहिण्यात आले आहे. आता बीआरएसच्या रूपाने आणखी एक नेता राज्यात पाय रोवू पाहतो आहे. याचा फटका शेतकरी संघटनेला बसण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सुरूवातीला सर्वजण हलक्यात घेतले होते. परंतु त्यांनी दिल्ली काबीज केली. डॉ.प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीलाही कमी समजण्याची चूक अनेकांना गोत्यात घेवून गेली. त्यामुळे के.चंद्रशेखर राव यांनाही कमी समजण्याचे कारण नाही, कारण हळूहळु त्यांनी आता गळ टाकायला सुरूवात केली आहे. सर्वच पक्षातील अनेक लहान, मोठे नेते निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी आणि रयत संघटनेला पश्चिम महाराष्ट्रातच थोडाफार जनाधार आहे. परंतु के. चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिरकाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेबरोबरच इतर लहान मोठ्या पक्षांनीही आता सावध भूमिका घेण्याची गरज आहे.

टिप्पण्या

Popular posts

कसबेडिग्रजमध्ये भांडणानंतर आण्ण्णासाहेब सायमोतेंचा मृत्यू

विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणार्‍या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; तीन ठार

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी