MY POSTS
निवडणुकीच्या तोंडावर खासदारांकडून ड्रायपोर्टची बनवाबनवी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जनप्रवास प्रतिनिधी
सांगली: जिल्ह्यात कधी रांजणी तर कधी सलगरे या ठिकाणी ड्रायपोर्ट करण्याचे आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजयकाका पाटील यांनी दिले होते. मात्र जवाहर नेहरू पोर्ट अॅथॉरिटीने ड्रायपोर्ट होणार नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे खासदारांच्या अशा बनवाबनवीला जनता बळी पडणार नाही. येणार्या निवडणुकीत त्यांना उत्तर देईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी खासदारांना ट्विटव्दारे दिला.
गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारणीचा गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात रांजणी किंवा सलगरे येथे डायपोर्ट होणार? अशी आशा जिल्ह्याला होती. मात्र सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी दिलेल्या माहिती अधिकार कायद्यामुळे ड्रायपोर्टचा भूलभुलैय्या उजेडात आला आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील ड्रायपोर्टला स्थगिती दिली असल्याचे पत्र जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्टने साखळकर यांना दिले आहे. यामुळे काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी खासदार संजयकाकांवर ट्विटव्दारे निशाना साधला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून जिल्ह्यात ड्रायपोर्ट होण्याबाबत भूलथापा देण्यात येत आहेत.
ड्रायपोर्टसाठी लागणार्या जागेच्या शोधाबाबत कधी रांजणी तर कधी सलगरेचे नाव पुढे करत जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. जवाहरलाल पोर्ट ट्रस्टने जिल्ह्यात नव्हे तर राज्यात ड्रायपोर्ट होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. त्यांच्याकडून करण्यात आलेली ड्रायपोर्टची बनवाबनवी कळण्याएवढी जनता सुजाण आहे व येणार्या निवडणुकीत त्यांना योग्य ते उत्तर देण्यात समक्ष असल्याचा वार विशाल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर केला. सध्या ड्रायपोर्टवरून खासदार संजयकाका पाटील व विशाल पाटील यांच्यात वाद आता मात्र चांगलाच रंगणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा