९८ किलो गांजासह १३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल केला जप्त : तिघांना केली अटक, दोघेजण पसार.
जनप्रवास । प्रतिनिधी
उमदी : आध्र प्रदेश मधून उमदी मध्ये विक्रीसाठी आलेल्या गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश उमदी पोलिसांनी मोठ्या शिताफीने केला. पोलिसांनी ९७ किलो ८५५ ग्रॅम वजनाचा वाळलेला गांजा आणि कार असा एकूण १३ लाख ६८ हजार ८२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजाची तस्करी करणाऱ्या इफतेखारूल हुसेन उर्फ अरबाज बाबासाहेब शेख (वय ३६ रा. कुपवाड), प्रतीक हरिदास कांबळे (वय २८ रा. नागराळे, ता. पलूस) आणि मोहसीन मेहबूब कागजी (वय २८ रा. १०० फुटी रोड, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश भाई (रा. राजमंद्री, आंध्र प्रदेश) आणि पिंटू माळी (रा. सांगली) हे दोघे पसार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना माहिती मिळाली कि, उमदीतील अमोघसिद्ध मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक जुनी स्विफ्ट गाडी (क्र. एमएच १३ एझेड १३७९) हि थांबली असून सदरच्या गाडीतून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होणार आहे. मिळालेल्या माहिती प्रमाणे संदीप शिंदे यांनी पथकासह त्याठिकाणी जाऊन छापा टाकला गाडीच्या पाठीमागे इफतेखारूल हुसेन उर्फ अरबाज शेख हा डिक्की मधून पोते खाली उतरवत असताना दिसला. पोलीस येताना पाहून गाडीतील दोघांनी भरधाव वेगात गाडीसह तेथून पलायन केले. यावेळी शेख याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ११ किलो ५५० ग्रॅम वजनाची १ लाख ७३ हजार २५० रुपये किमतीची गांजाची पाकिटे मिळाली. पळून गेलेले दोघेजण हे चडचण मार्गे सोलापूरच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदरची गाडी सोलापूर मार्गे सांगलीला जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील इचगाव टोल नाक्यावर सापळा लावला. मध्यरात्रीच्या सुमारास संशयित गाडी हि भरधाव वेगात टोल नाक्यावर आली असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने सदरची गाडी पकडली. गाडीची तपासणी केली असता त्यात ८६ किलो ३०५ ग्रॅम गांजाची पाकिटे मिळाली. सदर गांजाबाबत संशयितांकडे कसून चौकशी केली असता सदरचा गांजा हा आंध्रप्रदेश येथील राजमंद्री येथील प्रकाश भाई यांच्याकडून आणून सदरचा गांजा हा सांगलीतील पिंटू माळी याला विक्री करणार असल्याची माहिती दिली. यावेळी तिघांकडून तब्बल ९७ किलो ८५५ ग्रॅम वजनाचा गांजा आणि कार असा एकूण १३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, शिरीष शिंदे, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, अप्पासाहेब हाके, नितीन पलुसकर, महादेव मडसनाळ, मनीष कुमरे, इंद्रजित गोदे, सोमनाथ पोटभरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रभारी संदीप शिंदे यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा