शरद पवळ सांगली:
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप घडला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे राज्यात आता शरद पवार विरूध्द अजित पवार असा राष्ट्रवादीत संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह आ.जयंत पाटील समर्थकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गळ टाकला आहे. मात्र त्यांच्या गळाला नेते, कार्यकर्ते लागत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या सहा महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. अजित पवार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पाहिले होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ.जयंत पाटील यांना पदावरून हटवून अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास नकार होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासह ३० आमदारांनी राष्ट्रवादीत भूकंप घडवत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदे मिळाली. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार विरूध्द अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही गटाकडून राज्यात शक्तीप्रदर्शन केले जात आहे. आजी-माजी आमदारांसह पक्षातील दुसर्या फळीतील नेत्यांना गटात खेचण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी राज्यभर दौरे देखील केले जात आहेत. शरद पवार गटाची सूत्रे सध्या खा.सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या विश्वासू नेत्यांवर गळ टाकण्यास सुरूवात केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आ.मानसिंगराव नाईक यांना देखील अजित पवार यांनी दूरध्वनी करून गळ टाकला होता. मात्र त्यांनी भेटू परत असे सांगून टाळले. आ.नाईक यांचा शिराळा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आ.जयंत पाटील यांना मानणारा गट मोठा आहे. त्यामुळे भविष्यात अजित पवार यांच्या गटात आ.मानसिंगराव नाईक यांचा समावेश झाला तर त्यांना या गावांमध्ये फटका बसू शकतो. तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या काही वर्षात झालेल्या गैरव्यवहारामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याची भिती देखील अध्यक्षांसह विद्यमान संचालकांना आहे. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी आ.मानसिंगराव नाईक आमदारकीची मोठी रिस्क घेणार नाहीत. खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार सदाशिव पाटील यांच्यावर देखील अजित पवार यांनी गळ टाकला आहे. मात्र या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार अनिल बाबर प्रतिनिधीत्व करत आहेत. ते शिंदे गटाचे एकनिष्ठ आहेत. शिंदे-फडणवीस यांची युती निश्चित आहे. मग भविष्यात अजित पवार यांच्या गटात सदाशिव पाटील यांनी प्रवेश केला तर आ.अनिल बाबर यांना डावलून सदाशिव पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळणे देखील कठीण आहे. माजी आमदार विलासराव जगपात सध्या भाजपमध्ये आहेत. मात्र पक्षातील काही नेत्यांशी त्यांचे जमत नाही. भाजप सोडून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या गटात त्यांनी प्रवेश केला तर भाजप नेत्यांकडून निवडणुकीत मदत किती मिळेल? याची शंका आहे. त्यामुळे या नेत्यांना विचार करून प्रवेश करावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रात आ.जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी व नगरसेवक अतहर नायकवडी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याकडून अजित पवार गटाची ताकद वाढविण्यासाठी महापालिकेच्या आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवकांशी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. नायकवडी हे मिरजेचे नेते आहेत. मिरजेमध्ये स्थानिक राजकारण जोरात असते. त्या ठिकाणी निवडणुकीत अंतर्गत तडजोडी होत असतात. त्यामुळे तेथील काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात येतील. शिवाय नायकवडी यांनी अनेकवेळा पक्ष देखील बदलले आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व कसे स्वीकारणार? असा प्रश्न देखील आहे. तर सांगली व कुपवाडमध्ये आ.जयंत पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या गटाचे वर्चस्व मोठे आहेत. त्यामुळे अजित पवार गटामध्ये सामील होणार्या कार्यकर्त्याला महापालिकेच्या निवडणुकीत कशी ताकद मिळणार? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. अनेक आजी-माजी नगरसेवकांची पसंती अजित पवार गटापेक्षा भाजपला जास्त आहे. अजित पवार गटात अद्याप इच्छुकांची संख्या दिसून येत नाही. जिल्ह्याच्या राजकारणात आ.जयंत पाटील यांचा दबदबा आहे. भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लागल्या तर जिल्ह्यात अजित पवार गटाचे जिल्ह्यात प्रतिनिधीत्व करतील, असा नेता नाही. त्यामुळे अनेकांनी आ.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काम करणे पसंत केले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात आ.जयंत पाटीलच किंग असल्याचे बोलले जात आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा